महाराष्ट्राच्या मनात काय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल, ठाकरे बंधुंच्या भेटीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) गेले ही आनंदाची बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) गेले ही आनंदाची बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असे फडणवीस म्हणाले. मात्र काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही. हे फार मोठे स्टेटमेंट होईल असे फडणवीस म्हणाले.
राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार
मंत्री संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात बैठकांच्या मुद्यावरुन झालेल्या पत्रव्यवहाराबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. असं पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करु नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावं, त्यातील अडचण दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत, सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात असे फडणवीस म्हणाले. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात, यात कुठलाही संशय नाही. मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणे हे चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील, तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नये किंवा घेतल्या तर मंत्र्यांची मान्यता घेतली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सामांजस्य दाखवले पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलले पाहिजे असे फडणवीस म्हणाले.